मुंबईमध्ये फक्त भाजपाचा खासदार निवडून येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणेच भाजपामध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार. मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,” असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारी केल्याची आठवण करुन देत टोला लगावला.

“बावनकुळेभाऊ, पुढच्या सात जन्मातही…” बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानाचा रुपाली ठोंबरे पाटलांनी घेतला समाचार!

“निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

“नुसतं आमच्यावर बोलायचं, आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेलाही उत्तर

घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं टार्गेट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “घडयाळ बारामतीत बंद पाडले पाहिजे, कॉँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राचे पाणी आणून कशी विझवायची हेच आमचे टार्गेट आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून दूर गेले आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरेंना या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “त्यांना बोलू दे, यातून त्यांची वृत्ती समोर येत आहे. सूडबुद्धीने काम सुरु असून द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना संपवण्याची अशी भाषा कोणीही वापरली नव्हती. आतापर्यंत जे काही राजकराण झालं आहे त्याला पातळी होती. पण गेल्या पाच सहा वर्षात रुपयाप्रमाणे ती पातळी घसरत चालली आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aditya thackeray on bjp narayan rane mumbai mp maharashtra politics sgy