सध्याचे मुख्यमंत्री तात्पुरते असून, हे सरकार कोसळणार आहे असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात सरकार आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन लोकांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली. मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काही समर्थकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेऱे ओढले.
“आपल्या राज्यात लोकशाहीची स्थिती आहे का? लोकांनी निवडून आणलेलं सरकार आहे का? हे प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट असून, यामध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे तेच समजत नाही. कधी माईक खेचला जातो, कधी चिठ्ठी दिली जाते, कधी हवेतल्या हवेत विमान थाबंवलं जातं,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…
“हे सगळं सुरु असताना आपण तरुणांनी हे सरकार नक्की कोणाचं आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. विदर्भात अतिवृष्टी झाल्याने पूर आला, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण उत्तर देण्यासाठी सरकार कुठेच नाही,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
“हे सरकार पडणार असून सध्याचे जे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत, ते दिल्लीवरुन कधी कधी महाराष्ट्रात येतात. माझा कुठे दौरा झाला की तिथे जातात, थोडे फोटो काढतात आणि परत दिल्लीला जातात,” असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले “२० जूनला फूट पडली त्याच्या आधीपर्यंत राज्यात मुख्यमंत्री करोनापासून मुक्त करण्यासंबंधी बोलत होते. दुसरीकडे साडे सहा लाख खोटींची गुंतवणूक आणली. उद्योग आणले आणि सोबत रोजगारही आणले. मुंबईचा विकासही करत होतो. राज्याचा आणि तरुणांचा विकास आता थांबला असून सर्व लक्ष घाणेरड्या राजकारणाकडे आहे. त्यामुळेच हे राजकारण बदलण्याची आपली जबाबदारी आहे”.
“ही फक्त शिवसेनेची, महाराष्ट्राची नाही, तर देशातील कायद्याची लढाई आहे. जो काही कोर्टाचा निर्णय येईल, तो २०-३० वर्ष देशाला लागू होणार. आपल्या सत्याच्या बाजूने जायचं आहे, सत्तेच्या नाही,” असं आवाहनही त्यांनी केलं.