शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
नाणार प्रकल्प होणार की नाही?; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “चांगला मोठा प्रकल्प येत असेल…”
“आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही,” असं सांगत त्यांनी आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय असा इशाराही दिला. दरम्यान आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
“मीदेखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे. प्रत्येकजण कुठला तरी पालकमंत्री असतो. महाविकास आघाडीसारखा प्रयोग राजकीयदृष्ट्या आणि विकासासाठी यशस्वी ठरला आहे. काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढलेले असतात तिथे ही खदखद असते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून या नाराजी दूर करतात. राजकारणात थोडं पुढे मागे हे चालत राहतं. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत हे महत्वाचं आहे,” असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
“सत्तेतून बाहेर पडण्यासंबंधी त्यांचं मत वैयक्तिक असेल. पण अर्थसंकल्पात आत्ताही आणि आधीही सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न आहे. नाराजी साहजिक असते पण ती दूर करण्याचा प्रयत्न आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
तानाजी सावंत काय म्हणाले?
“सरकारच्या अर्थसंकल्पातदेखील शिवसेनेला दुय्यम-तिय्यम स्थान मिळते. अर्थसंकल्पात ६०-६५ टक्के निधी राष्ट्रवादीला ,तर ३०-३५ टक्के निधी काँग्रेसला मिळतो. फक्त १६ टक्के एवढाच निधी शिवसेनेला मिळतो. त्यातही उच्च व तंत्रशिक्षण खाते शिवसेनेकडे असल्यामुळे दहा टक्के निधी वेतनातच खर्च होतो. केवळ ६ टक्केच निधी विकास कामांसाठी शिवसेनेच्या वाटय़ाला येतो. राष्ट्रवादीचा सामान्य ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील सरकारकडून एकेक कोटीचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर बसून नाचतो, आम्ही शिवसैनिकांनी शिवभोजन थाळीवरच समाधान मानायचे. त्यातही पुन्हा बिले मिळण्यासाठी सहा सहा महिने वाट पाहायची,” अशा शब्दांत सावंत यांनी खदखद जाहीरपणे प्रकट केली.
“आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करत आहात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आम्ही सहन करणार, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत.” असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला.
“आज आमचा निधी, आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागतं आणि ते गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. प्रचंड नाराजी आमची या दोन पक्षांवरती आहे हे मी जाहीरपणे सांगतो. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला आज सत्तेचं तोंड पाहायला मिळत आहे, त्याची फळं चाखालयला मिळत आहेत. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पक्षावरती तुम्ही एवढा अन्याय करतात, आम्ही का सहन करायचं?” असंही तानाजी सावंत म्हणाले.
यशवंत जाधव यांच्या डायरीतील ‘मातोश्री’ उल्लेखावर भाष्य
“अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं यापुरतं मी मर्यादित ठेवतो,” असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आत्ताच्या काळात अफवा किती पसरवल्या जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही,” असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
यंत्रणा मातोश्रीच्या दरवाजापर्यंत पोहोचल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “हे राजकीय षडयंत्र आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही तिथे या गोष्टी सुरु आहेत. ना घाबरता या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडं राजकारण सुरु आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोकं सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येतं त्यातून हे सुडाचं राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. “.
भाजपासोबत पुन्हा मैत्री?
“गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे भाजपा सर्व पक्षांना वागणूक देत असल्याचं पाहिलं आहे. वाढती महागाई, बेरोजगारी लपवण्यासाठी यंत्रणा तसंच हे विषय समोर आणले जात आहेत का हादेखील प्रश्न आहे. हे राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामं, विकास करत राहणं गरजेचं आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. भाजपासोबत पुन्हा मैत्री होण्यासंबंधी प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरेंनी “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, जोर जबरदस्ती करत असेल तर मैत्री करणार का?,” असा प्रतिप्रश्न विचारला.
नाणारचं काय?
“नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. लोकवस्ती असल्याने नाणारमधून बाहेर हलवण्यात आलं आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन,” अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.