राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विरोधक ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. शेतकरी प्रतिक्षेत असताना राज्य सरकारकडून मदतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

“…एवढं केलं तरी पुरेसं आहे”, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्र; ठाकरे सरकारची करून दिली आठवण!

आदित्य ठाकरे गुरुवारी सकाळी नाशिक दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यानंतर ते पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंनी नाशिक येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्या मागण्या, त्यांचं झालेलं नुकसान याबाबतची माहिती घेतली. “या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत,” अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पांढुर्ली येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका, उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवलं आहे असं सांगितलं. “गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, पण मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी शिंदे ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला मदत सोडा, मुख्यमंत्री भेटायला पण आले नाहीत, असं गाऱ्हाणं मांडलं.

Story img Loader