शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निवाडा विधानसभाअध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे या निकालानंतर ‘शिवसेने’चे सारेच आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवार, १० जानेवारी रोजी राज्याच्या राजकारणाचा ऐतिहासिक निकाल लागला. गेल्या दीड-दोन वर्षांपासून शिंदे गटातील १६ आणि ठाकरे गटातील १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. तसंच, खरी शिवसेना नक्की कोण हा पेचही निर्माण झाला होता. तात्पुरत्या स्वरुपात निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्षनाव शिंदे गटाला दिले होते. तर खरी शिवसेना कोण हे ठरवण्याचे सर्वाधिकार विधानसभा राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. त्यानुसार, शिंदे गटाला राहुल नार्वेकरांच्या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला. हा निकाल लागत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांनी आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांचे दर्शन घेतले. याबाबत त्यांनी एक्सवरून पोस्ट केली आहे.

हेही वाचा >> उद्धव ठाकरे गटाचे आमदार आता विधानसभेत कुठे बसणार? राहुल नार्वेकर म्हणाले, “मी त्यांना…”

एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना…, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेनेचे १६ आमदार पात्र ठरले असून शिवसेना पक्ष देखील आमचाच असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयानंतर आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच ठाण्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल नार्वेकरांनी काय निकाल दिला?

जवळपास १०५ मिनिटे चाललेल्या निकालवाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ या तीन गोष्टींवर प्रामुख्याने भाष्य केले. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड आणि पक्षातील निर्णयाचे सर्व अधिकार देणारी पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या १९९९ च्या पक्षघटनेनुसार शिवसेनाप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांना निर्णयाचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही दोन्ही पदे वेगवेगळी असून पक्षादेश जारी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीचे मत म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena again ready to build a new maharashtra chief minister reached anand ashram after receiving the approval of real shivsena sgk