राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात नाराजी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत सध्या घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची नाराजी जाहीर केल्यानंतर नेत्यांमध्ये भेटीगाठी सुरु आहेत. शिवसेनेचा मूळ आक्षेप गृहखात्यावर असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील गृहखातं शिवसेनेला मिळाला तर आनंदच असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक आहे. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

ते म्हणाले की, “शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडून गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. हे ऐकूनच मला आश्चर्य वाटलं. मुख्यमंत्र्यांना सर्व मंत्र्यांचे अधिकार असतात. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून त्यांना कोणतंही खातं ठेवण्याची गरज नाही. सर्व खाती त्यांच्या नियंत्रणात असतात. राष्ट्रवादीकडूनही कधीतरी खासगी आम्हाला मुख्यमंत्रीपद हवी असल्याची चर्चा सुरु असते. आता कदाचित त्यांच्यात अदलाबादल होणार असेल तर माहिती नाही”.

पुढे ते म्हणाले की, “गृहमंत्रीपद भाजपावर सूड उगवण्यासाठी हवं आहे, जनतेची सेवा करण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नको. याच सूड भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष भाषा करत असेल तर आश्चर्य आहे”

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण –

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे. “अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader