राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी लॉकडाउन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनी संताप व्यक्त केला असून हा बदनामीचा कट असल्याचा आरोप केला आहे. तसंच आपण कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला असून डिसेंबरमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“किरीट सोमय्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मी किरीट सोमय्यांना बांधील नाही. किरीट सोमय्या मला प्रश्न विचारू शकत नाहीत. ज्या अधिकृत संस्थांनी- यंत्रणांनी मला प्रश्न विचारले आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. जिल्हाधिकारी, पोलिसांसमोर सर्व कागदपत्रं आहेत. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण बदनानी कऱण्यासाठी जाणूनबुजून माझा संबंध जोडत आहेत. शासकीय यंत्रणा याबाबत योग्य ती कारवाई करतील,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.
“जाणूनबुजून संबंध जोडायचा आणि माझी, महाविकास आघाडी, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची हा किरीट सोमय्यांचा धंदा आहे. मी अब्रूनुकसानीचा दावा हायकोर्टात दाखल केला आहे, डिसेंबरमध्ये ही केस येईल. किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये द्यावे लावतील,” असा इशारा अनिल परब यांनी यावेळी दिला.
१० हजारपेक्षा जास्त एसटी कामगार निलंबित
“एसटी कामगारांची दिशाभूल होत असून ते भरटकले आहेत. यामध्ये एसटी आणि कामगारांचं नुकसान होत आहे. सदावर्ते यांचं नुकसान होत नाही. कामगार भरडले जात आहेत. कामावर नसल्याने महिना-दीड महिन्याचा पगार त्यांनी गमावला आहे. आधीच आपला पगार कमी असल्याची त्यांची तक्रार आहे आणि अशावेळी पगार न मिळणं काही योग्य नाही,” असं अनिल परब यांनी म्हटलं.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “आज १० हजारापेक्षा जास्त कामगार निलंबित झाले आहेत. अडीच हजारापेक्षा जास्त रोजंदारीवर असणाऱ्यांची नोकरी गेली आहे. प्रशासनाला कारवाईचं पाऊल पुढे टाकावं लागत आहे. निलंबित झाले आहेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होऊ शकते. सरकारची अजिताब इच्छा नाही, पण लोकांना वेठीस धरुन जर अत्यावश्यक सेवा अडवली जात असेल तर सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. हे सर्व पर्याय वापरावे लागतील”. मेस्मा लावण्याबाबत अजूनही आमची बैठक व्हायची आहे, ती झाल्यावर निर्णय घेऊ असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
२२ हजार कामगार कामावर परत
“२२ हजार कामगार कामावर परत आले आहेत. १२५ डेपोमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बऱ्यापैकी सुरु असून विदर्भ, मराठवड्यात थोडी कमी सुरु आहे. २० तारखेनंतर सर्व काही सुरळीत होईल,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.