शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर अखेऱ शिदें गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत त्यांनी कोणतंही अधिकृत विधान त्यांनी केलं नव्हतं. मात्र आज सकाळी अर्जुन खोतकर दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ३१ जुलैला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती आहे.
दिल्लीत भेटीगाठी
अर्जुन खोतकरांनी जाहीरपणे आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलेल नसलं तरी दिल्लीत त्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रावसाहेब दानवे यांच्यानंतर आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीसाठी ते पोहोचले होते. श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बंडखोर आमदार अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत उपस्थित होते.
अर्जुन खोतरांचा सूचक इशारा
अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की “मी जालनाला गेल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेणार आहे. कुटुंबीय तसंच सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल”.
“मी दिल्लीवरुन जालनाला परत गेलोच नव्हतो. अब्दुल सत्तार माझे सहकारी, मोठे बंधू असून भेट घेण्यासाठी आले आहेत. आमच्यात काही चर्चा झाली आहे. येथून गेल्यानंतर मी निर्णय घेणार आहे,” असं अब्दुल सत्तार म्हणाले. ३१ जुलैला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांसंबंधी विचारलं असता, “उद्या निर्णय घेणार असून, परवा सांगू” असं सूचक विधान त्यांनी केलं. अर्जुन खोतकरांनी यावेळी आपण लोकसभा मतदारसंघ सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश कऱणार – अब्दुल सत्तार
“अर्जुन खोतकर यांनी आमच्याशी चर्चा करून शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे,” असा दावा अब्दुल सत्तार यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे. “अर्जुन खोतकर यांनी आमच्याशी चर्चा करून शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे. सिल्लोड येथील सभेमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल. खोतकर आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे. दोन्ही एकत्र आल्याने जालना मराठवाडाचा विकास करता येईल,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.