शिवसेनेतील नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर मोठे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला रामदास कदम यांनी दिला असून शिवसेनेपेक्षा शरद पवार मोठे आहेत का? अशी विचारणा केली आहे. यानंतर शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असा सल्ला दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्यावर चांगलीच टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुम्ही कसली हकालपट्टी करता, मीच तुम्हाला…,” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका; खदखद मांडताना अश्रू अनावर

“ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी एकही अवाक्षर काढलं नव्हतं. मी मरेपर्यंत शिवसेनेसोबत आहे एवढं बोलल्याचं माझ्या लक्षात आहे. अडीच वर्षात त्यांनी मातोश्रीवर पाय ठेवला होता का? शिवसेना नेते म्हणून तुमची नैतिक जबाबदारी होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अभिनंदनही केलं नव्हतं. ही स्वयंकेंद्रीत लोकं असून, मोठ्या मनाची नव्हती आणि आजही नाहीत,” अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

“शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना…”, पक्षफुटीवर बोलताना रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

“शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला काय दिलं नाही हे त्यांनी सांगावं. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जनतेने नाकारलं होतं, तेव्हा तुम्ही शिवसेना प्रमुखांना आमचं पुनर्वसन करा अशी विनंती केली होती. त्यावेळी यांचं आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं सुरु झालं होतं. तो प्रयत्न सुरु केल्याचं लक्षात येताच पक्षाने काळजी घेतली. यानंतर शिवसैनिकाला बाजूला करुन त्यांना तिकीट दिलं आणि विधानपरिषदेवर आणलं. यानंतरही तुमचं समाधान होत नाही का?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे.

“७० वर्षांचा असूनही…”, रामदास कदमांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावं लागल्याची खंत; म्हणाले, “दीड वर्ष माझ्या…”

“शरद पवार असोत किंवा काँग्रेस असो शिवसेना सुरुवातीपासून विरोधात होती. पण कडाडून टीका करताना बाळासाहेब मैत्रीदेखील जपत होते. सुप्रिया सुळे लोकसभेत उभ्या राहिल्या तेव्हा बाळासाहेबांनी शरद पवारांना फोन केला होता. शरदबाबू तुम्ही सुप्रियांना उभं करतंय का अशी विचारणा केली होती. यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेचा उमेदवार विरोधात न देण्याचा निर्णय घेतला होता. पण यानंतरही राजकीय लढाई सुरुच होती, पण मैत्री आणि माणुसकी किती होती पहा. हे यांना काय माहिती आहे. तेव्हा शरद पवारांना भेटू नका असा विरोध केला नाहीत,” याची आठवण अरविंद सावंत यांनी करुन दिली.

“शरद पवारांबद्दल मनात एवढा राग असेल तर याच एकनाथ शिंदेंचं भाजपासोबत जमलं होतं का? हे सांगावं. २०१४ मध्ये युती कोणी तोडली? लोकसभेत एकत्र आणि विधानसभेत मात्र शेपटू काढणार, त्यामुळेच युती तुटली. एकट्या उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले. त्या ६३ आमदारांचा विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथ शिंदेंचीच निवड केली होती. पण तिथेही यांची पुन्हा एकदा कधी सत्तेत जातो यासाठी घालमेल सुरु झाली होती. तेदेखील तिकडून काहीतरी टाकत राहतात आणि हे शेपट्या हालवतात,” अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.

“एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे मंचावरुन भाजपासोबत जमणार नाही सांगितलं होतं. तेव्हा भाजपा आवडली नाही आणि आता काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जुळत नाही. नेमकं जुळतं कोणासोबत ते तरी सांगा?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena arvind sawant on ramdas kadam allegations on uddhav thackeray sgy