राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट जास्त आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केल्यापासून समर्थकांमधील उत्सुकता वाढली आहे. यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य करत एक ट्वीट केलं आहे.
दसरा मेळाव्यावरून राजकारण; शिवसेना, शिंदे गटात गर्दीचे दावे-प्रतिदावे
अरविंद सावंत यांनी ट्वीट करत शिंदे गटावर लाचार, बेईमान, कचरा अशी टिप्पणी केली आहे. यावेळी त्यांनी विकलेल्या निष्ठा माहिती नाही अशी टीका करताना आक्षेपार्ह उल्लेखही केला आहे.
अरविंद सावंत यांचं ट्वीट –
एक तरफ लाचार
एक तरफ सदाचार,
एक तरफ बेईमान
एक तरफ निष्ठावान,
एक तरफ दसरा
एक तरफ कचरा,
बिके हुये क्या जाने निष्ठा
गुमराह कर रहे खाकर विष्ठा !
दसरा मेळाव्यावरून शिवसेना, शिंदे गटात गर्दीचे दावे-प्रतिदावे
दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत असून वांद्रे-कुर्ला संकुलातील शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था आहे, तर शिवसेनेच्या शिवाजी पार्कमधील मेळाव्यात ४० हजार खुर्च्या असतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. पोलिसांच्या अंदाजापेक्षा दुप्पट गर्दी होईल, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी केला, तर शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरून बाहेरही कार्यकर्ते उभे असतील, असे शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. यावरून गर्दी कोणत्या मेळाव्यात अधिक होणार यावरून दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
ठाकरे यांच्यानंतर शिंदे यांचे भाषण?
दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यात भाषणांवरून कुरघोडी होण्याची चिन्हे आहेत. शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरच मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण करावे, अशी शिंदे गटाची योजना आहे. म्हणजेच ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देता येईल. ठाकरे भाषण रात्री आठच्या सुमारास सुरू होते व नऊपर्यंत पूर्ण होते. रात्री ९ नंतर शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करण्याची योजना आहे.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?
शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
“गुलाबरावर पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. टीका करायची तरी कशी,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं, त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचाही यांचा समावेश होता.