उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कामगारांचा प्रश्न गंभीर बनला होता. सरकारी कर्मचारी म्हणून सेवाशर्तींचा लाभ मिळावा, महामंडळाला सरकारमध्ये विलीन करावं अशा मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संप पुकारला होता. यानंतर सरकारने मध्यस्थी करून वेतनवाढ, वेतनहमी अशा काही उपाययोजना केल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र, आता पुन्हा काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर तेव्हा संपामध्ये सक्रीय दिसणारे गोपीचंद पडळकर चर्चेत आले आहेत. त्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पडळकरांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सेवाशक्ती संघर्ष या एसटी कामगारांच्या संघटनेचे नेते आहेत. एसटी कामगार संघ आणि सेवाशक्ती संघर्ष या संघटनांनी आपल्या १६ मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारीसापासून आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महामंडळाने या इशाऱ्याची दखल घेऊन आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत?

अरविंद सावंत यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकरांचा उल्लेख ‘तमासगीर’ असा केला आहे. “गोपीचंद पडळकर तमासगीर आहे. लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तमाशा केला त्यांनी. टाळ काय वाजवतायत? बोलतायत काय? तेव्हा मागणी केली होती की एसटी महामंडळ शासनात विलीन करा. अशीच आहे त्यांची मागणी. आता ते का गप्प आहेत? कारण पगार देता येत नाही”, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

“…म्हणून कायद्याने बंडखोर आमदार अपात्र व्हायला हवेत”, अरविंद सावंतांनी सांगितला ‘तो’ नियम! मतांच्या आकडेवारीचा दिला दाखला

“ही कोण माणसं निर्माण झाली आहेत?”

“उद्धव ठाकरेंनी महिन्याला ३६० कोटी रुपये महामंडळाला द्यायचा निर्णय घेतला. दिवाकर रावते आणि अनिल परब यांनी आणलेला निधी एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वाधिक आहे. हजार कोटी रुपये तर एका वेळी आणले अनिल परब यांनी. अनेक निर्णय त्या दोघांनी घेतले. मग ही कोण माणसं निर्माण झाली ज्यांचा काहीच संबंध नाही? काय बोलतात, जाऊ द्या”, असंही अरविंद सावंतांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, मोहीत कम्बोज यांनी केलेल्या टीकेलाही अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं. “मोहित कम्बोज कोण? पैशाने श्रीमंत झाला म्हणजे अकलेनं श्रीमंत झाला का? कम्बोज तिकडे आहेत म्हणून वाचलेत.. नाहीतर त्यांच्यावरही ईडी धाड टाकेल”, असं सावंत म्हणाले.

Story img Loader