महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील. पण, इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा, कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही, अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वेदान्त फॉक्सकॉन’नंतर टाटा-एअर बस प्रकल्प गुजरातला गेला आहे. राज्यात होणारे प्रकल्प बाहेर गेल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यावरून शिवसेनेने केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारचा ‘सामना’तून समाचार घेतला आहे. “महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे राष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे, पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात, ‘भाजप सोबत आल्याने मी आज समाधानी आहे.’ छान! महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा,” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने टीका केली आहे.

हेही वाचा : बच्चू कडू- राणा वाद अखेर संपुष्टात ; पुन्हा चूक केल्यास ‘प्रहार’चा वार दाखवण्याचा इशारा

“देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन…”

“महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंध्रात, उत्तर प्रदेशात, बिहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड किंवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत, व त्या ‘किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. मग तो फॉक्सकॉन प्रकल्प असो किंवा रांजणगाव येथे होणारे ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ असो,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा : आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षाही जलदगतीने विचार येतात – भगतसिंह कोश्यारी

“रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच…”

“महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे प्रकल्प ओरबाडून नेले जात आहेत आणि मिंधे-फडणवीस सरकार भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना सभेतील प्रमुख लोक जसे माना खाली घालून बसले होते तसे बसले आहे. रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील उद्योग-रोजगार संधींचे अपहरण गुजरातेत केले जात आहे. हे अपहरण उघड्या डोळ्याने पाहणारे मुख्यमंत्री त्यांच्या मिंधे गटासह रामदर्शनासाठी म्हणे अयोध्या नगरीत निघाले आहेत, हा विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्राला कंगाल बनविण्यासाठी व राज्याचा स्वाभिमान, अस्मिता खतम करण्यासाठीच महाराष्ट्रात मिंधे सरकार स्थापन झाले हे आता नक्की झाले,” असे टीकास्त्र शिंदे गटावर शिवसेनेने केलं आहे.

हेही वाचा : प्रकल्पांवर फडणवीस बोलले, मला अधिक बोलायचे नाही! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

“मिंध्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व, स्वाभिमान, महाराष्ट्राचे कल्याण वगैरे…”

“महाराष्ट्राला एक उद्योगमंत्री आहेत, ते काय करीत आहेत? तर स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी प्रकल्पांचे अपहरण झाल्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडून जबाबदारी झटकत आहेत. मिंध्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व, स्वाभिमान, महाराष्ट्राचे कल्याण वगैरे शब्दांचे बुडबुडे फोडत एक सरकार बनवले ना? मग आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर का फोडत आहे? पुन्हा काय, तर या प्रकल्पांबाबत ‘श्वेतपत्रिका’ काढू, असेही या महाशयांनी मंगळवारी जाहीर केले. अशा पत्रिका काढण्यापेक्षा महाराष्ट्रातले प्रकल्प पळवून नेले म्हणून दिल्लीत जाऊन थयथयाट करा,” अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांचाही समाचार शिवसेनेने ‘सामना’तून घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena attack narendra modi amit shah eknath shinde devenra fadnavis over maharashtra project moving gujrat ssa