‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने भाजपावर केला आहे.
पुण्यात सोमवारी ( १८ ऑक्टोंबर ) झालेल्या पावसाने एकच दाणादाण उडाली होती. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक सोसायट्या, घरात पाणी शिरलं होतं. यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला होता. तर, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारणही पेटलं होतं. त्यातच शिवसेनेही पुण्यातील या परस्थितीवरून ‘सामना’तून भाजपाचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा : गौतम अदानींनंतर अनंत अंबानींनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण
“विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला…”
“‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली,” अशी टीका शिवसेनेने महापालिकेत सत्ताधारी राहिलेल्या भाजपावर केली आहे.
हेही वाचा : “…अन्यथा तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही,” राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे विधान
“जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते…”
“पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवड्यातील धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. सोमवारी कोसळलेल्या पावसाने पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र, नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढीत आहेत,” असेही शिवसेनेने म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांनी ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे…”
“पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील पुराच्या परिस्थितीचे खापर पावसावर फोडले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’, असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले. पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपाने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले. परंतु, भाजपाच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला, त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला,” अशा शब्दांत शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.