विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. आहे.

नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावरुन याआधीही विधासभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपा नेत्यांनीही हे बरोबर नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा शिवसेनेकडून नितेश राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोमवारी विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

VIDEO: आदित्य ठाकरे येताच ‘म्याव म्याव’ आवाज का दिला?, नितेश राणेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला सांगा, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफी देखील मागितली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू अस त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते,” असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते.

१२ आमदारांच्या निलंबनांतर नितेश राणेंनी माझ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नेत्यांचा वारंवार अपमान होत आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. “चंद्रकांत पाटलांची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांच्या मागणीनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नितेश राणे यांना निलंबित करा अन्यथा त्यांनी सभागृहात येऊन हात जोडून माफी मागायला सांगा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

आदित्य ठाकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन बोलताना नितेश राणे यांनी, “मी म्याव म्याव केलं कारण शिवसेनेची अवस्थाच म्याव म्यावसारखी झाली आहे. ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी शोधलं पाहिजे. आधी वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याव म्याव करणारी शिवसेना आहे,” असे म्हटले होते.  आम्हाला आता शिवसेनेच्या आक्षेपाची सवय झाली आहे, अशीही प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली होती.

Story img Loader