गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव यांच्या कथित नाराजीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी “भास्कर जाधव हेही गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते, आम्ही त्यांना सोबत घेण्याला विरोध केला”, असा दावा केला होता. यासंदर्भात भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा असताना त्यावर खुद्द भास्कर जाधव यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. चिपळूणमध्ये घेतलेल्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर भास्कर जाधव यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले भास्कर जाधव?

भास्कर जाधव यांनी आपण उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार असल्याचं यावेळी ठामपणे सांगितलं आहे. “आम्ही मैदान सोडणारी माणसं नाहीत. मी उद्धव ठाकरेंना सांगितलंय. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असेल ते असू द्या. तुम्ही काहीही करा, पण माझा शब्द आहे. २०२४ ची विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही हे मी त्यांना सांगितलंय. त्यामुळे कालच्या बातम्या पेरण्यात आल्या. मग त्यांना मी कशाला उत्तर देऊ?” असा प्रतिप्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

“भास्कर जाधव स्वतःचं कसं खरं आहे, हे रेटून न्यायचा प्रयत्न करतात. पक्षांतर्गत वाद निर्माण करण्याव्यतिरिक्त त्यांना काही येत नाही. शिवसेना-भाजपा अशी पुन्हा आघाडी होत असतानाच त्यांना आम्ही घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे आता त्यांना घेण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच भास्कर जाधव यांना दुसरा कोणता पक्ष स्वीकारेल, असे मला वाटत नाही”, असंही योगेश कदम म्हणाले होते. त्यावरून टीका करताना भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षफुटीवेळी घडलेला एक प्रसंग उपस्थितांना सांगितला.

“सगळे उद्धव ठाकरेंना सांगत होते की…”

“२० तारखेला राज्यसभेसाठी मतदान झालं. २१ तारखेला हे सगळे सूरतला गेले. मला उद्धव ठाकरेंचा फोन आला की तुम्ही ताबडतोब कार्यालयात या. मला थोडा वेळ लागला. वर्षा बंगल्यावर बैठक होती. मी पोहोचलो तेव्हा तेव्हा बैठक संपत आली होती. ११ खासदार उपस्थित होते. १७-१८ आमदार वगळता बाकी सगळे उपस्थित होते. तेव्हा तिकडे गेलेले हे आमदारही होते. बरेच आमदार आपण भाजपाबरोबर जायला हवं असा सल्ला उद्धव ठाकरेंना देत होते”, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

‘तेव्हा गुवाहाटीसाठी भास्कर जाधवदेखील बॅग भरून..’, आमदार योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

“मी तिथे उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्हा काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल. हे सगळ्यांसमोर मी त्या बैठकीत उद्धव ठाकरेंना सांगितलं. तेव्हा उद्धव ठाकरे मला म्हणाले की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहून भाजपाविरोधात लढू. मी आज मंत्रीपदासाठी लढत नाही, आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी लढतोय”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“मी तपास संस्थांना घाबरत नाहीये, भाजपा नेत्यांनी माझा खून करण्याचं जाहीर सभेत म्हटलं. तेव्हा शेवटचं षडयंत्र म्हणून मला बदनाम करण्याचं काम चालू आहे. पक्ष सोडून जाणं वगैरे माझ्या मनातही नाही. रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा आहे का?” असा खोचक सवालही भास्कर जाधव यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena bhaskar jadhav targets yogesh kadam refers uddhav thackeray pmw