शिवसेना-भाजपाची युती म्हणडे गोलमाल रिटर्नस अशी खोचक टीका मुंबई काँग्रेस महासचिव भूषण पाटील यांनी केली आहे. सोमवारी मुंबईत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून टीक केली जात आहे. भूषण पाटील यांनी ट्विट करत युतीवर निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीपूर्वी आणि गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपा लोकांसोबत दुहेरी भूमिकेचा खेळ खेळत आहे. जनतेसमोर एकमेंकाची उणीधुणी काढायची आणि निवडणुकीच्यावेळी एकत्र यायचे. लोकांना यांचे खरे रूप समजले आहे. आगामी निवडणूकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना उत्तर देईल असा विश्वास भूषण पाटील यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे. ट्विटर करताना भूषण पाटील यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यामध्ये गेल्या पाच वर्षात शिवसेना आणि भाजपाने एकमेंकाविरोधात केलेले आरोपप्रत्यारोप दाखण्यात आले आहेत. तसेच व्हिडीओच्या शेवटी खास मेसेजही देण्यात आला आहे. दोस्ती दुष्मनीत दडलाय यांचा स्वार्थ, उघडा डोळे मतदारांनो आणखी बळी नको, ओळखा यांचे खरे रूप..यांचे खरे रूप ओळखा. भाजपा-सेना ठरविती खेळ खेळू गंमतीचा, जुमलेगिरीतून फोकस मारू गेम करू रयतेचा. तू-तू मी-मी करत माध्यमांनाही यांनी वेड्यात काढले आहे. असे व्हिडीओत म्हटले आहे.
They did same thing during BMC elections & from last 25 yrs they are doing same thing with their double standard play with people of Maharastra .. keep fighting & get back together during elections. Now people know the truth & they will answer in polls #ShivSena #GolmalReturns pic.twitter.com/MFavkxFNTR
— Bhushan Patil (@bhushankpatil12) February 18, 2019
भारतीय जनता पार्टी व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील, असा निर्णय सोमवारी मुंबईत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व प्रकाश जावडेकर, शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. या युतीबद्दल बोलताना सामान्य माणसांचं, तळागाळातल्या लोकांचं, शेतकरी बांधवांचं हित राखण्यासाठी आम्ही घेतला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत लवकरात लवकर झालंच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती जी आम्ही मान्य केली आहे असंही भाजपाने सांगितलं.