शिवसेनेतील बंडळीनंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहेत. यामेळाव्यातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहे. पण, कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर केला आहे.
“आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलला आहे. वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं. तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण, त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा – “एकनाथला एकटानाथ होऊ देऊ नका”, जयदेव ठाकरेंची शिवसैनिकांना साद; म्हणाले, “महाराष्ट्रात शिंदेराज्य…”
“ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ…”
“ज्या लोकांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. मात्र, ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या-दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण, तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं,” असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.