राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधील वितुष्ट कमालीचं वाढलं आहे. शिवाय आता शिवसेनेतून फुटून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील वादाला चांगलीच धार चढली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू असतानाच शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी दुहीचा शाप गाडून टाकण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. मात्र, त्याचवेळी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांनी भाजपाला देखील लक्ष्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड
भाजपासोबत युती तोडल्यापासून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेनं युती केल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यासंदर्भात लवकरच दोन्ही पक्षांच्या युतीची पुढील वाटचाल कशी असेल, याबाबत माहिती दिली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी जाहीर केलं. “मी या युतीचं स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंना खोचक शब्दांत टोला लगावला. एकनाथ शिंदे यांनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिल्याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरे म्हणाले “बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो सुटला. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण इतर वेळी त्यांच्या हेरयंत्रणा कार्यरत असतात, त्याप्रमाणे त्यांनी माझ्या भाषणाचीही नीट माहिती घेऊन बोलावं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!
भाजपाला सवाल
दरम्यान, भाजपाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून यावेळी उद्धव ठाकरेंनी परखड सवाल केला. “२५ ते ३० वर्ष आम्ही हिंदुत्वाच्या स्वप्नासाठी भाजपासोबत युती केली होती. संघाची एक विचारधारा आहे. पण ती विचारधारा घेऊन भाजपा पुढे जातेय असं तुम्हाला वाटतंय का? आपल्या मातृसंस्थेलाच भाजपा मानत नसेल, तर त्यांना याबाबत विचारायला हवं. संघाची विचारसरणी भाजपाला मान्य आहे का? मान्य असेल तर तसे ते वागत आहेत का? मोहन भागवतांनी गेल्या दोन-चार वर्षांत मांडलेल्या मतांनुसार भाजपा वागतेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे म्हणतात…
“केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, प्रादेशिक पक्ष संपवून टाकणं यालाच लोकशाही मानणारे लोक आता बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. हा निकाल शिवसेनेच्या भवितव्याचाच असणार नाही, तर देशात लोकशाही राहील की बेबंदशाही असेल, हे ठरवणारा हा निकाल असेल”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.