शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी झाल्यानंतर राज्यातलं उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि नवं सरकार अस्तित्वात आलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होताच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे. बंडखोरीवरून शिवसेनेकडून शिंदे गटाला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ‘खरी शिवसेना आपलीच’ असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दसरा मेळाव्याचं राजकारण…
गेल्या दोन महिन्यांपासून दसरा मेळाव्यासंदर्भात सुरू असलेल्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पडदा पडला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला नेमकी कुणाला परवानगी मिळणार? असा वाद सुरू होता. मुंबई महानगर पालिकेनं शिवसेना आणि शिंदे गट या दोघांनाही ही परवानगी नाकारली. अखेर उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावलं असून अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचेही ताशेर ओढले. शेवटी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी देण्यात आली. शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.
“असे दसरा मेळावे…”
शिंदे गटाकडून बीकेसीमध्ये दसरा मेळावा घेतला जाणार असून तिथे मोठी गर्दी होण्याचे दावे केले जात आहेत. यावर उद्धव ठाकेरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. “शिवसेना एकच आहे. कोण कुठे काय करतंय माहीत नाही. असे दसरा मेळावे होतच असतात. इतरांचेही होत असतात. पंकजाताईही एक घेते. पण शिवसेनेचा मेळावा एकच, शिवाजी पार्कवर”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत हे सांगावं लागतं हे त्यांचं दुर्दैवं आहे”, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय.
महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश!
“सगळ्यांना वाटत होतं की आता शिवसेनेचं काय होणार? पण शिवसेनेचं काय होणार याचं उत्तर मिळण्याआधीच शिवसेना दहा पावलं पुढे गेली आहे. अनेकजण रोज भेटायला येत आहेत. ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधीही आले होते. त्यांचाही मेळावा होणार आहे. रोज कुणीतरी मातोश्रीवर येऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगत आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सुनील महाराज यांच्या रुपाने संजय राठोडांना शह?
बंडखोर आमदार सुनील राठोड यांना बंजारा समाजाचा मोठा पाठिंबा आहे. मात्र, या समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या माध्यमातून संजय राठोडांनाच शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात विचारलं असता उद्धव ठाकरेंनी असं काही असल्याचं नाकारलं. “मी शह वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मला पुढे जायचंय. जे सोबत येतील, ते माझे आहेत. लढाईच्या वेळी जे सोबत येतात, त्यांचं महत्त्व अधिक असतं. एवढा मोठा समाज सोबत आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला शह देणं ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. मी तो विचार करत नाही. मी समाजाचा विचार करतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राठोडांवर टीका
महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी नाव न घेता संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे. “आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला आनंद आहे. आपण म्हणत होतो की साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा. आता नवरात्रीतच सुनील महाराज इथे आले आहेत. बंजारा समाजाचे कडवट सैनिकही त्यांच्यासोबत आहेत. मध्यंतरी आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण यांना जेव्हा यांना समजलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, तेव्हा अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही हे यांच्या लक्षात आलं. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.