शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेऊन आले. त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये भाजपा, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ यांचं सरकार यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यासंदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य कसं असेल, याविषयी उद्धव ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
‘लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरं दिली.
यावेळी आदित्य ठाकरेंच्या उत्तर प्रदेशातील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे राष्ट्रीय राजकारणात आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात सक्रीय राहणार असं काही ठरलंय का? अशी विचारणा होताच उद्धव ठाकरे यांनी अशी शक्यता फेटाळून लावली.
“तुम्हाला सगळंच पाहिजे, मग आम्ही धुणी-भांडी करायची का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल!
“माझीही राजकारणात आदित्यसारखीच सुरुवात”
यावेळी उद्धव ठाकरेंनी आपलीही आदित्य ठाकरेंप्रमाणेच राजकारणात सुरुवात झाल्याचं नमूद केलं. “आमच्यावर कुणीही राजकारण लादलेलं नाही. त्या काळी माझीही आदित्यसारखी राजकारणात सुरुवात होत होती. घरात जन्मापासून जे वारे वाहतात, ते अंगात भिनतात. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही. जर तुला जनतेनं स्वीकारलं तर तू तुझ्या वाटेनं पुढे जा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“आता आदित्य त्याच्या वाटेनं पुढे जातोय. विचार देतोय. लोकांना पटलं तर ते त्याला स्वीकारतील. पण अशी विभागणी करून (आदित्य ठाकरे राष्ट्रीय राजकारणात आणि उद्धव ठाकरे राज्यात) एक होता राजा, त्याला दोन मुलं होती, मग राज्याची वाटणी झाली असं नाही होत. पक्ष एक आहे, विचार एक आहे. आदित्य त्याच्या मार्गाने पुढे जातोय”, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.