मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना दुसरीकडे भाजपा नेते मात्र यावरुन टोलेबाजी करत आहेत. यादरम्यान औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवकाने केलेली जाहिरातबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं सांगत नगरसेवकाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.
जाहिरातीत काय म्हटलं आहे?
शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी ही जाहिरात दिली असून औरंगाबादमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. “ईडी, आर्थिक कोंडी आणि बदनामी करुन उद्धव ठाकरे सरकारला घेरलं तर गाठ शिवशक्ती-भीमशक्तिशी आहे,” असा इशारा चेतन कांबळे यांनी जाहिरातीतून गिली आहे.
Maharashtra News Live : महाराष्ट्रासह देशभरातील क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
शिवसेनेचे आज औरंगाबादमध्ये शक्तिप्रदर्शन ; मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोना परिस्थिती प्रभावीपणे हाताळली याची दखल जागतिक पातळीवर अमेरिकन, युरोपियन संस्था, मीडियाने घेतली. उत्तर प्रदेशप्रमाणे गंगाकिनारी लाखो प्रेतं बेवारस दफन केले नाहीत. थाळ्या, टाळ्या वाजवून नाकर्तेपणा केला नाही,” असा टोला चेतन कांबळे यांनी लागवला आहे.

उद्धव ठाकरेंवर प्रतिगाम्यांचा राग का? अशी विचारणा करताना चेतन कांबळे यांनी आमचे हिंदुत्व बहुजनांचे आहे. दीड टक्क्यांचे नाही, शेंडी-जानव्याचे नाही असंही म्हटलं आहे.
दीड हजारांवर पोलीस तैनात
उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात राहणार आहे. सभेच्या परिसरात १७ सीसीटीव्हीद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. पाच पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, २०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह एक हजार पोलीस कर्मचारी व ४०० गृहरक्षकदलाचे जवान तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. तसेच शहराचा वाढता विस्तार पाहता अतिरिक्त दोन पोलीस उपायुक्त पदांचा प्रस्तावही पाठवण्यात आलेला आहे. सभेसाठी बाहेरगावहून येणाऱ्या वाहनांसाठी कर्णपुरा मंदिर परिसरातील मैदान, विवेकानंद लॉ कॉलेज, एमपी लॉ कॉलेजच्या परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
सभेला एक लाख मतदार औरंगाबाद शहरातून उपस्थित राहणार
सत्तेत प्रमुखपदी असणाऱ्या शिवसेनेची ताकद दाखविण्याच्या उद्देशाने तसेच संघटन बांधणीचा भाग म्हणून गेल्या १५ दिवसात १५०० हून अधिक बैठका घेण्यात आल्या असून पहाटे क्रीडांगणापासून ते भाजी बाजारातही सभेला येण्याची पत्रके वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या सभेला एक लाख मतदार औरंगाबाद शहरातून उपस्थित राहतील असा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान मराठवाडय़ातील शिवसेना नेत्यांच्या बैठका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतल्या आहेत.