सत्तेत परस्परांसोबत मित्रत्त्वाच्या नात्याने सहभागी असूनही, भाजप आणि शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा तर गेल्या काही दिवसांत सातत्याने पाहायला मिळतो आहे. मुंबईतील विविध कामांवरून आशिष शेलार शिवसेनेवर निशाणा साधतात. तर दुसरीकडे शिवसेनाही आपल्या ठाकरी भाषेत त्याला चोख प्रत्युत्तर देते. असेच काहीसे सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखातूनही पाहायला मिळाले. आशिष शेलार यांचे स्पष्टपणे नाव न घेता शिवसेनेने त्यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली. इतकेच नाही तर त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमाही देण्यात आली आहे.
‘कुत्रे पिसाळले’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘काही लोक न पिसाळताही चावतात व असे चावणे हा ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा परिणाम आहे काय, यावर नामदार चंद्रकांत पाटील यांनी प्रकाश टाकला पाहिजे. आम्ही काही बाबी महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी परखडपणे मांडतो, पण काही राजकीय येडबंबूंना सत्तेची सुस्ती व बधिरता आल्यामुळेच त्यांची अवस्था चाळीसगावच्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली आहे असे मानायचे काय?’
‘काही लोकांना डोळे उघडल्यावर हिंदुस्थानच्या खदखदणार्या सीमा दिसतात. पाकड्यांचा सदैव सुरू असलेला विश्वासघात दिसतो. ज्यांना प्रखर राष्ट्रवादाची व देशभक्तीची दृष्टी आहे त्यांना हेच दिसणार व दिसत राहणार. हा दृष्टिदोष नसून संस्कार आहे, तर काही लोकांना दिवस-रात्र फक्त ‘गटारे’ दिसतात. पाकिस्तानचे आक्रमण महत्त्वाचे की गटारे महत्त्वाची या प्रश्नांवर जनमत घेतले तर लोक संस्कार व राष्ट्रभक्तीस उचलून धरतील, पण महाराष्ट्रात व देशातही सध्या एकंदरीत जो गोंधळ चालला आहे तो पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी भावना लोकात निर्माण होऊ नये.’, असा टोला शेलार यांना लगावण्यात आला आहे.
‘फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर चालले आहे व शिवसेनेला लोकांना जाब द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचा जन्म फक्त सत्तेसाठी नसून आम्हाला सत्ता हवी आहे ती लोककल्याण, महाराष्ट्राची अस्मिता व राष्ट्राच्या रक्षणासाठी. त्यामुळे याबाबत काही वाकडेतिकडे झाल्यास आम्ही डोळे मिटूनही शत्रूंचा समाचार घेऊ व लोकांच्या अंगावर येऊन चावणार्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू,’ असाही इशारा अग्रेलखातून देण्यात आला आहे.
शिवसेनेकडून आशिष शेलार पुन्हा लक्ष्य, पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा
सत्तेत परस्परांसोबत मित्रत्त्वाच्या नात्याने सहभागी असूनही, भाजप आणि शिवसेना एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-07-2015 at 10:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena criticized ashish shelar in harsh language