अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भाजपाने अखेर माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदावर ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. यावरूनच शिवसेनेने भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. पुढे पुढे पहा. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपा आणि शिंदे सरकारचा शिवसेनेने ‘सामना’तून समाचार घेतला आहे. “शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील. पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल. मशालीच्या अग्निप्रकाशात भविष्यातील शिवसेनेचे तमाम विजयमार्ग आम्हाला स्पष्ट दिसत आहेत,” असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : समृद्धी महामार्ग : दिवाळीआधी राज्यातील जनतेला शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट? पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतीक्षा

“भडकलेली मशाल बेइमानीचे इमले जाळून टाकेल”

“शरद पवारांपासून राज ठाकरेंनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाट्य हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे, याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो,” असेही शिवसेनेने म्हटलं आहे.

हेही वाचा : “पुण्याचा विकास पाण्यातून…” भाजपाला ‘शिल्पकार’ म्हणत पुण्यातील पावसावरून जयंत पाटलांचा खोचक टोला

“आधी ऐटीत बेटकुळ्या फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना…”

“शिवसेनेच्या विजयी मशालीने या पोटनिवडणुकीतील संकटे व अमंगलाचा नाश केला. भाजप… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेईमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी ऐटीत बेटकुळ्या फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले,” अशा शब्दांत भाजपावर शिवसेनेने टीकेचे ‘बाण’ सोडले आहेत.