केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी ( ८ ऑक्टोंबर ) शिवसेनेचं पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होते. त्यानंतर सोमवारी ( १० ऑक्टोंबर ) आयोगाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला नव्या नावांचे वाटप केलं. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. यावरून आता शिवसेनेने एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर आसूड ओढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्यामागे भ्रष्ट, बेइमान गेंड्याची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार?,” अशा शब्दांत ‘सामना’तून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांवर शिवसेनेने टीकास्त्र डागलं आहे.

हेही वाचा – “ही ‘उद्धव बाळासाहेब सेना’ नव्हे तर ‘उद्धव काँग्रेस सेना’ आहे”

“शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे…”

“ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिलं. ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केलं. त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केलं आहे. तसे, या मंडळींनी केलं नाही, शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिवसेनेने शिंदे गटाला दिला आहे.

“केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे…”

सामनातून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचाही समाचार घेण्यात आला आहे. “निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटलं आहे. जगात न्याय आहे, असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले व मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले,” अशा शब्दांत केसरकरांवर टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा – “काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर…”, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यावर शहाजी बापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका

“भुजबळ, राणे, राज ठाकरे बाहेर पडले पण…”

अग्रलेखात भुजबळ, राणे आणि राज ठाकरेंचाही उल्लेख करण्यात आला आहे. “मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. महाराष्ट्र त्यामुळे आकांत करीत आहे. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली,” असेही सामनात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena criticized eknath shinde and shinde camp rebel mlas over ec freezes shivsena name and symbol ssa
Show comments