दुष्काळाचे राजकारण नको, या सूत्राची अंमलबजावणी शरद पवार यांनी स्वतःपासूनच करावी. मात्र, दुष्काळ असो की स्मशान कुठेही राजकारण करायचे, हाच ज्यांचा श्वास आहे. त्यांच्याकडून दुष्काळाच्या प्रश्नी राजकारण न करण्याची अपेक्षा कशी करावी, असा प्रश्न विचारत शिवसेनेने मंगळवारी शरद पवार यांच्यावर टीका केली.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखामधून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली. शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे व ते दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे दु:ख वगैरे समजून घ्यायला पुन्हा एकदा दौर्यावर निघाले आहेत. सरकारने या कामी त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हरकत नाही, असाही टोला लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तेव्हाही शेतकर्यांचे प्रश्न व दुष्काळाच्या समस्या होत्याच, याची आठवण करून देत त्यावेळी विरोधी पक्षांत असलेल्यांना शेतकऱयांच्या प्रश्नावर आणि दुष्काळावर राजकारण करू नये, असे सल्ले देण्यात येत होते. त्यावेळीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने दुष्काळाची तरतूद करून ठेवली असती, तर आज ही कठीण वेळ राज्यावर आलीच नसती, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यावेळच्या सरकारने जलसिंचनाच्या योजना अंमलात आणल्या नाहीत त्यामुळेच आज दुष्काळाची तीव्रता वाढली, असाही आरोप करण्यात आला आहे.
दुष्काळ निवारणासाठी सरकारने शरद पवारांची मदत घ्यावी – शिवसेनेचा टोला
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील अग्रलेखामधून शरद पवारांवर टीका करण्यात आली
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 08-09-2015 at 13:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena criticized sharad pawar over drought issue in maharashtra