मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणं मुंबईच्या माजी महापौरांना चांगलंच भोवलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) माजी महापौर, दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा, दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना दत्ता दळवी म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलं आहे. आनंद दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द वापरला, तोच मी बोललो आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चर्चेत आलेले दत्ता दळवी कोण आहेत आपण जाणून घेऊ.
कोण आहेत दत्ता दळवी?
जसं दत्ता दळवी यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं तसं ते बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली होती. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच ते चर्चेत आले. बाळासाहेब ठाकरेंचा विश्वास त्यांनी संपादन केला. शिवसेनेच्या विभागा क्रमांक सातच्या विभागप्रमुखाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसंच २००५ आणि २००७ या कालावधीत दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणूनही काम केलं. या काळात त्यांची कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईत दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक कडवट शिवसैनिक तयार केले. त्यामध्ये दत्ता दळवी यांचे नाव पहिल्या यादीत येतं. भांडुपमध्ये रविवारी शिवसेनेचा ठाकरे गटाच्या कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणात शिवीगाळ केली. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर दत्ता दळवी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
२०१८ मध्ये दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटले. तसंच शिवसेनेवरही दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसह राहणंच पसंत केलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवी दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
दत्ता दळवी यांचं नाव एप्रिल २०२२ मध्येही चर्चेत आलं होतं. त्यावेळी मालवण तालुक्यातील एका गावात अनधिकृतपणे बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दळवी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा देखील दाखल केला होता.