शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट स्वीकारली आणि महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोरचं आव्हान आता उद्धव ठाकरे कसं पेलणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकनाथ शिंदे गट भाजपामध्ये न जाता अजूनही आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरेच आमचे पक्षप्रमुख असल्याचं ठामपणे सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेमकं पुढे काय होणार आहे? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अजूनही पाठिंबा मिळत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली असल्यामुळे शिवसेनेचे अजून काही आमदार किंवा खासदार शिंदे गटाला जाऊन मिळणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनातून राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्वीटमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
काय आहे ट्वीटमध्ये?
दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आपल्याला कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असं नमूद केलं आहे. “शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातली शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. एकनाथ शिंदेंनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका”, असं या ट्वीटमध्ये दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ
“भविष्यात काय होईल, माहीत नाही”
दरम्यान, पुढे काय होईल, हे आपल्याला माहीत नसल्याचं दीपाली सय्यद यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “भाजपा आमची शत्रू नाही. त्यांच्याविरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण भाजपाने याची दखल घेणं गरजेचं आहे”, असा सूचक उल्लेख दीपाली सय्यत यांनी केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी “या सगळ्यात सिवसैनिक हरला असून शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवून शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे”, असा सल्ला ट्वीटच्या माध्यमातून दिला होता.