Shivsena Demands in Mahayuti Explained by Deepak Kesarkar : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत, यावर भाजपा पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केलं आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले असले तरी गृहमंत्रीपद मिळावं या मागणीवर ते ठाम आहेत. २०१४ ते २०१९ पर्यंत पाच वर्षांच्या युतीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद फडणवीसांकडे होतं. महायुतीच्या सरकारमध्ये देखील हे पद फडणवीसांकडेच होतं. पुढील सरकारमध्ये देखील फडणवीसांना हे पद आपल्याकडेच ठेवायचं असल्याची चर्चा आहे. गृहमंत्रीपद सोडण्यास भाजपा व देवेंद्र फडणवीस तयार नाहीत. त्यामुळे आता गृहखात्यावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. अशातच एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटल्यानंतर तडकाफडकी त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी निघून गेले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शिंदे रविवारी साताऱ्यावरून ठाण्याला परतले. सोमवारी ते वर्षा बंगल्यावर गेले. मात्र सायंकाळी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर शिंदेंनी त्यांच्या सर्व बैठका रद्द केल्या आणि त्यांच्या ठाण्यातील घरी निघून गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. ते बैठकांना उपस्थित राहत नाहीत. या नाराजीनाट्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे का? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीत शिवसेनेची (शिंदे) नेमकी मागणी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, आमच्या नेत्यांचा योग्य सन्मान राखावा ही आमची मागणी आहे असं शिवसेनेचे (शिंदे) नेते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> एकनाथ शिंदे यांच्या विश्रांतीमुळे बैठका रद्द; प्रकृती अस्वास्थतेमुळे वैद्याकीय सल्ल्यानुसार ठाण्यातील निवासस्थानी मुक्काम

दीपक केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका

दीपक केसरकर म्हणाले, “कार्यकर्ते म्हणून आम्हा शिवसैनिकांची मागणी आहे की आमच्या नेत्याचा योग्य तो मानसन्मान राखावा. कारण खरी शिवसेना कोणाची आहे ते एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं आहे. ही युती एकट्या शिवसेनेची नाही. युती ही भाजपा व शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे यांनी ही युती केली तेव्हा त्यावर अनेकांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थि केले. आमच्या शिवसेनेला काहीजण खोटी शिवसेना म्हणाले. परंतु, आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं. आमची शिवसेना हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे हे आम्ही सर्वांनी सिद्ध केलं. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांवर चालते. आमच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील आमच्याकडेच आहे. आमचीच शिवसेना खरी असून निवडणुकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ते सिद्ध केलं आहे, हे त्यांचं फार मोठं यश आहे. त्यामुळे आमच्या नेत्याचा योग्य मान-सन्मान राखावा”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena demands in mahayuti deepak kesarkar explains eknath shinde maharashtra government formation asc