काही दिवसांपूर्वीच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलनं विजय मिळवला असला तरी नितेश राणेंना मात्र मतदानापासून दूर ठेवण्यात आलं होतं. उच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र, आता नारायण राणेंच्या आदेशानुसार नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात आता शिवसेनेनं खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला असून नितेश राणेंचं संचालक पद एका मिनिटांत जाऊ शकतं, असं म्हटलं आहे.
शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी काल नारायण राणेंना सुनावल्यानंतर आता नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आलेल्या नितेश राणेंचं संचालकपद एका मिनिटात जाऊ शकतं, असं ते म्हणाले आहेत. “जिल्हा बँकेत थकीत संचालक असू शकतो का? हा कायदेशीर मुद्दा आहे. पण उच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं नाकारलं होतं. त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं. मला खात्री आहे की याची नोंद होईल. शेवटी याचसाठी केला होता अट्टाहास”, असा टोला दीपक केसरकरांनी लगावला.
केसरकरांनी सांगितला ‘हा’ नियम!
“एवढं सगळं त्यांनी केल्यानंतरही ते मागच्या दाराने संचालक म्हणून ते तिथे गेले आहेत. तरी त्यांना कायदेशीर बाबींना तोंड द्यावंच लागेल. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून गेला असला, तरी कोणताही थकित संचालक असू शकत नाही हा सहकारचा नियम आहे. पण पुढे काय होईल हा कायद्याचा प्रश्न आहे. त्यावर मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मात्र त्यांनी चांगलं काम तिथे करावं. समजा ते होऊ शकत नसतील तर त्यांना ते पद सोडावं लागेल”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
नितेश राणेंचं संचालकपद जाणार?
“तिथे त्यांच्याविरुद्ध ज्यांनी निवडणूक लढवली आहे, ते भूमिका घेतील. ते जर कोर्टात गेले, तर एका मिनिटात हे संचालकपद रद्द होऊ शकतं”, असं देखील केसरकर म्हणाले.
“थोडी तरी लाज बाळगा, ज्या कुटुंबामुळे…”, नारायण राणेंना दीपक केसरकरांनी सुनावलं!
संचालक झाल्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया…
“जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी आणि माझे सहकारी प्रकाश मोरे यांची निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केली आहे. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याचं व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही आणि आमचे सहकारी त्या चौकटीत बसतो आमच्या खांद्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.