Shivsena : रायगडच्या पालकमंत्री या पदावरुन निर्माण झालेला वाद शमण्याची काही चिन्हं नाहीत. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यात उभा दावा निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने तर सुनील तटकरे यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्रीपदावरुन पंचांचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरेंना याच कोपरखळीवर उत्तर दिलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतोआणि या सामन्यात तुम्ही कप्तान होताना सगळंच मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेटचं उदाहरण आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं म्हणत थोरवे यांनी सुनील तटकरेंना सुनावलं. तसंच आपल्या भाषणात तटकरे यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली.

आमचा औरंगजेब सुतार वाडीत बसला आहे-थोरवे

महेंद्र थोरवे म्हणाले, “राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील” तसंच ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचं उदाहरण देत सुनील तटकरे यांना थोरवेंनी थेट औरंगजेबाची उपमा दिली. ‘आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय’, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

भरत गोगावलेंनी नेमकं काय म्हटलं आहे?

रायगडचे पालकमंत्री पद वरिष्ठांच्या विचाराधीन आहे. आमचे तिन्ही नेते याबाबत विचार करत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्याकडून आदेश झाला की हा तिढा सुटेल. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे भरत गोगावले यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ जानेवारीपूर्वी जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. यामध्ये रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाच्या नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. या निर्णयावर नाराज होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियु्क्तीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद अद्याप रिक्त आहे. मध्यंतरी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीलाही शिंदे गटाच्या आमदारांना आमंत्रण न मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अर्थमंत्री अजित पवार आणि अदिती तटकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती.