शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांनी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच सरकारने महापुरुषांची बदनामी करणाऱ्या भिडेंना अटक करण्याची मागणी केली. यानंतर आता सत्ताधारी शिंदे गटातील एका नेत्यानीही भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “संभाजी भिडेंनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असं माझंही मत आहे. ते दरवेळी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात. माझ्या शेतातली आंबे खा म्हणजे पोरं होतात हा कोणता तर्क आहे. असं बोलणं योग्य नाही. संभाजी भिडेंचा कुणी सन्मान करत असेल, तर याचा अर्थ तोंडात येईल ते बोलणं योग्य नाही. मीही त्यांचा निषेध करतो.”

“समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे”

“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सांगणार आहे की, अशी वारंवार वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर एकदा तरी कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी संजय शिरसाटांनी केली.

हेही वाचा : संभाजी भिडेंना फाशी देणार का? नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले

“ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्याला द्वेषपूर्ण भाषणाची मुभा”

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, “आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत. मात्र, ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्या नालायक माणसाला द्वेषपूर्ण भाषण देण्याची मुभा आहे. हे कोणतं राजकारण आहे आणि हा शासन चालवण्याचा कोणता प्रकार आहे.”

“भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर…”

“आम्ही रविवारपर्यंत (३० जुलै) शांत बसू. तोपर्यंत संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर आम्ही आंदोलन छेडू. तेव्हा ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिला.

हेही वाचा : “संभाजी भिडे बोलले ते इतकं…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना भावना अनावर; म्हणाले, “मला खरी चिंता…!”

“संभाजी भिडे भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत”

नाना पटोलेंच्या टीकेवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नाना पटोलेंनी जरा अभ्यास करून बोललं पाहिजे. संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. ते भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत आणि कुठल्याही पदावरही नाही. त्यामुळे संभाजी भिडेंचा संबंध भाजपाशी जोडणे योग्य नाही.”

“भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी”

“संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी आहे. त्या वक्तव्याचा काही विपर्यास झाला आहे का त्याची सरकार चौकशी करेल आणि योग्य विचार करेल,” असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde faction leader demand action on sambhaji bhide pbs
Show comments