Shivsena एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला खासदार आणि आमदार उपस्थित राहतील असं ठरवण्यात आलं आहे. तसंच पदाधिकाऱ्यांची जी फेरनियुक्ती करण्यात येईल असं ठरल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी शिवसेनेचा मेळावा

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदार कदम यांनी दिली. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली होती. तेव्हा मोठा वाद झाला होता. २३ जानेवारीला बीकेसीमध्ये एक भव्य मेळावा होणार आहे असंही रामदास कदम यांनी सांगितलं.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”

बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. रामदास कदम म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात, अमित शाह यांच्यावर टीका केलीत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटत आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? देवेंद्र फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का?”, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात?-कदम

उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले, तर बाळासाहेब ठाकरेंना खूप दुःख होईल. त्यांच्या मनाला वेदना होतील. माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील. ही बाब होणे आवश्यक आणि गरजेची आहे”, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.

Story img Loader