मंगळवारी अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली असून जोपर्यंत दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार राज्यात आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरुच राहणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले दीपक केसरकर?
सातत्याने संजय राऊतांच्या संगतीत राहिल्याने उद्धव ठाकरेंची भाषा घसरू लागली आहे. आपण बाळासाहेबांची चिरंजीव आहोत, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवलं पाहिजे. कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या अनेक योजनांसाठी भरघोस निधी मिळाला आहे. यामध्ये मुंबईतल्या मेट्रो तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे, हे उद्धव ठाकरेंना माहिती नाही का? असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर, पण…
बूट चाटतात का? अशा प्रकारचे शब्द प्रयोग करणं योग्य नाही. उद्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलं, तर त्यांना बूट चाटतात, असं म्हटलं तर चालेल का? माझ्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. पण अशाप्रकारे कोणाची संभावना करायची नसते, केली तर ती आम्ही सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहाटे चार वाजेपर्यंत जागून काम करतात आणि तुम्ही सकाळी ११ वाजता उठून त्यांच्यावर टीका करता? हे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
घटनाबाह्य म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचा अधिकार कुणी दिला? ते घटनाबाह्य आहेत की नाही, हे न्यायालय ठरवेन, ते तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. आजपर्यंत उद्धव ठाकरे आमच्या आमदारांबाबत खूप काही वाईट बोलले, मात्र एकाही आमदाराला काहीही झालेलं नाही. ज्या आमदारांचे निधन झालं, त्यांची बदनामीदेखील उद्धव ठाकरे यांनी केली, हा अधिकार त्यांना कुणी दिला? अशी टीकाही दीपक केसरकर यांनी केली.
हेही वाचा – शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र ओरबाडला व मंबईची लूट केलीी. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. तसेच दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार जोपर्यंत राज्यात आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरुच राहणार आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली होती.