Ramdas Kadam on Ajit Pawar : शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, “ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. त्यादिवशी बाळासाहेबांचा विषय त्यांच्यासाठी संपला. आता ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं काय घेऊ शकतात? बाळासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर संघर्ष करण्यात घालवलं. आता उद्धव ठाकरे त्याच शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.”
हेही वाचा- “…म्हणून मैदानही तेच राहणार” दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला!
“त्यामुळे आमची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे, असं उद्धव ठाकरेंना म्हणता येणार नाही. शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकारही तुम्हाला नाही. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदारही निवडून आले नसते, सगळं संपलं असतं, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- “रस्त्यावरील शेंबडं पोरगंही…” शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!
रामदास कदम यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीकास्र सोडताना म्हटलं की, “एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. त्यांनीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली, नाहीतर अजित पवारांनी सर्व शिवसेना खाऊन टाकली असती, पुढील ८ -१० वर्षात काहीच शिल्लक राहिलं नसतं.”