शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. “भाजपासोबत जे गेले आहेत, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण ते आता गुलाम झालेत, त्यांनी भाजपाची गुलामी पत्करली” असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाला बदनाम करण्यासाठी बंडखोर आमदारांना गुलाम, गद्दार आणि पळपुटे म्हटलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कदम म्हणाले की, “राष्ट्रवादीचे गुलाम कोण आहेत? हेही उद्धवजींनी पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन राष्ट्रवादीने स्वत:च्या आमदारांना ५७ टक्के निधी दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीनं एवढा मोठा निधी घेतला. त्यामुळे कोण-कुणाचा गुलाम आहे? हे आपण पाहिलं पाहिजे. केवळ भाजपाला बदनाम करण्यासाठी बंडखोर आमदारांना गुलाम, गद्दार आणि पळपुटे म्हटलं जात आहे. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही बोला. पण काल एकनाथ शिंदेंच्या सभेला लाखो लोकं होती, ते सर्वजण गुलाम, गद्दार आहेत का?” असा सवालही रामदास कदम यांनी यावेळी विचारला आहे.

हेही वाचा- “ईडीच्या कारवाईबाबत संसदेत चर्चा व्हावी” शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदींचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र

“राष्ट्रवादीने स्वत:ला ५७ टक्के निधी कसा घेतला? यावर संजय राऊतांनी कधी मुलाखत दिली का? राष्ट्रवादीनं स्वत: च्या आमदारांना निधी देऊन शिवसेनेच्या आमदारांना आयुष्यातून संपवण्याचं कटकारस्थान केलं, यावर संजय राऊत कधी बोलले का? तर नाही बोलले. त्यामुळे कोण कुणाचा गुलाम होता आणि कोण कुणाचा गुलाम आहे? हे संपूर्ण महाराष्ट्र आज पाहत आहे. आपणच राष्ट्रवादीचे गुलाम आहोत का? याचं आत्मपरीक्षण स्वत: केलं पाहिजे” असा खोचक टोलाही कदम यांनी लगावला आहे.

हेही वाचा- “त्यांच्या अंगात जी रग आहे, ती…” राऊतांच्या अटकेनंतर आनंद दीघेंचे पुतणे केदार दीघेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? याचंही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याआधी संजय राऊतांना जेव्हा ईडीची नोटीस आली होती, तेव्हा शरद पवारांनी स्वत: दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. ते नवाब मलिकांसाठी दिल्लीला गेले नव्हते, पण राऊतांसाठी गेले होते. त्यामुळे कोण कुणाचं गुलाम आहे? कोण कुणाच्या हाताखाली काम करतंय? आणि कोण कुणाच्या मांडीवर बसलंय, हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय” असंही रामदास कदम म्हणाले.

Story img Loader