मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यामुळे एकीकडे आरोप-प्रत्यारोप होत असताना राज ठाकरेंच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. त्यातच आता राज ठाकरे उद्या हनुमान जयंतीला पुण्यात असतील हे स्पष्ट झालं आहे. पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असल्याचं पोस्टर लागलं असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. दरम्यान सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची यावरुन राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला असल्याने येत्या हनुमान जयंतीला ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र याबद्दल आता स्पष्टता झाली आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही आरती होणार आहे.
दरम्यान राज ठाकरेंचा हिंदुजननायक उल्लेख करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, “हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय? राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते. आता ठीक आहे त्यांनी पक्ष बदलला त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही”.