राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी नेत्यांकडून एकमेकांविरोधात विधानं केली जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे तिन्ही पक्ष एकत्र सरकार चालवत असताना स्थानिक राजकारणात मात्र नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. यामुळे रायगडसह अनेक ठिकाणी राजकीय वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यातही गेल्या काही दिवसांपासून वाद रंगत असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नुकतंच गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जाहीर आव्हानच दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं होतं. तसंच यावेळी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला होता. त्यांच्या यी टीकेला गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथील कार्यक्रमात नाव न घेता अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

“काही लोक माझ्याविषयी नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. त्यांनी कडाला कडं लावून बोलावं, चारीमुंड्या चीत करून हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही,” असं आव्हानच गुलाबराव पाटील यांनी मंचावरुन बोलताना दिलं. पण ते छोटी लढाई करतात, पण आपण जाहीरवाले आहोत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“आमच्या वडिलोपार्जित कोणी राजकारणात नव्हते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिस्तबद्ध, वचनबद्ध सेवाभावी व नामर्दांना स्थान नसलेली संघटना शिवसेना आली व त्यात मी सहभागी झालो, आमदार, खासदार होऊ असा विचार कधी स्वप्नातही नव्हता. आता काही लोक मिरवतात, त्यांनी मिरवावं. त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“शिवाजी महाराजांच्या सैन्यात गद्दारांना जागा नव्हती, कडेलोट करायचे. त्या राजांच्या विचारावर चालणारे आपण आहोत. बोलण्यात मी किती फाटेतोंडाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी काही फार सुसंस्कृत, शिकलेलो नाही. पण मला जे कळतं ते तुम्हाला कळतं का माहिती नाही. माझ्यावर अत्यंत वैयक्तिक टीका केली जात आहे. पण जिल्ह्याचा पालकमंत्री असताना माझ्यात कधीही मी पणा आला नाही. सर्वांना घेऊन विकासाची रथयात्रा काढण्याचा प्रयत्न करत असून भविष्यातही करत राहीन,” असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena gulabrao patil on ncp eknath khadse in jalgaon sgy