ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केल्याची माहिती समजत आहे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी पेडणकरांची चोकशी केली आहे.
उद्या पुन्हा एकदा पेडणेकरांना दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. याबाबतचा समन्सही बजावला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एसआरए घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. या गुन्ह्यांत आतापर्यंत किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. मात्र, किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांची चौकशी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- “अध्यक्ष महोदय, हे फायनल करा” २५ पैशांच्या नाण्यावर लावला नारायण राणेंचा फोटो, तक्रार दाखल
किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच यासंदर्भात एक ट्वीटही केलं होतं. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये सहा गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की त्यांनी सदनिकांचा ताबा घ्यावा, असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊनही किशोरी पेडणेकरांवर आरोप केले आहेत.