राज्यात गेल्या तीन महिन्यंपासून शिवसेना विरुद्ध शिंदेगट असा थेट सामना पाहायला मिळत असला, तरी शिवसेना आणि भाजपा या पक्षांमधील वितुष्टही राजकीय घडामोडींमुळे कमालीचं वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत असतात. नुकतंच पंकजा मुंडेंचं एक विधान चर्चेत आल्यानंतर त्यावरून शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांकडून भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही यावरून भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडेंचं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. ‘आपल्या विधानाचा चुकीची अर्थ काढला आहे’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं असलं, तरी राजकीय वर्तुळात या विधानावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
दरम्यान, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांनी मुंबई पत्रकारांशी बोलताना पंका मुंडेंनी भाजपामधील परिस्थितीला वाचा फोडल्याचं विधान केलं आहे. “मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही. कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडील, आजोबा, काका, भाऊ असं सगळं कुटुंबच राजकारणात मुरलेलं आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून राजकारणाचं बाळकडून घेतलं आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“पंकजा मुंडे स्पष्ट आणि कार्यशील महिला आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षातली खदखद बोलून दाखवली. स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला मांडीवर घेऊन खाऊ-पिउ घालून गुटगुटीत करण्याचा देशात ट्रेंड दिसतोय. त्याला पंकजा मुंडेंनी वाचा फोडली आहे”, अशा शब्दांत पेडणेकरांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे.
आशिष शेलारांनाही केलं लक्ष्य
दरम्यान, यावेळी बोलताना किशोरी पेडणेकरांनी आशिष शेलार यांनाही लक्ष्य केलं आहे. “मळमळीवर एकच सल्ला आहे, धौती योग घ्या ना”, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला दिला होता. त्यावर किशोरी पेडणेकरांनी तोंडसुख घेतलं.
“शब्दांचे फवारे उडवण्यात आशिष शेलार तरबेज आहेत. हिंदूंचे पारंपारिक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. विदर्भात गरबा होत नाही, भोंडला साजरा होतो. पण राजस्थान, गुजराती, मारवाडी गरबा करतात. त्यात सगळेच आनंद घेतात. सात्विक भाव कितीही असला, तरी आनंद घेणं महत्त्वाचं आहे. त्यात तुमचं राजकारण का वळवळतंय.मुद्दाम मळमळतंय, तळमळतंय असं म्हणत आहेत. धौती चूर्ण तुम्हीच घ्या”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.