एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट राजकीय सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना मराठी माणसाला संपवत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच किशोरी पेडणेकरांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर तोंडसुख घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“..ही खरी यांची पोटदुखी आहे”

शिंदे गटाच्या टीकेवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंवर ते सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना चारही बाजूंनी घेरलंय. तरीदेखील उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होत नाहीय. ही खरी यांची पोटदुखी आहे.”

“उद्धव ठाकरेंवर टीका नाही केली, तर यांना भाजपामध्ये कुणीही स्थान देणार नाही. उद्धव ठाकरेंवर जेवढं जास्त बोलणार, तेवढा यांचा तिथला हिस्सा वाढत जाणार”, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं.

एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

दरम्यान, यावेळी बोलताना किशोरी पेडणेकरांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं. “माझ्यासारखी सामान्य स्त्री महापौर होऊ शकते. सामान्य रिक्षाचालक म्हणून तु्म्ही यूडीचे अधिकारी झालात. आज त्याच आधारावर तुम्ही मुख्यमंत्रीही झालात. त्यामुळे शिवसेनेनं मराठी माणसाला उलट आधार दिला. तुमच्या-आमच्या कष्टांना वाव दिला. उद्धव ठाकरेंनी जास्त वरदहस्त तुमच्यावर ठेवला”, असं पेडणेकर म्हणाल्या.

बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना पत्र; म्हणाला, “साहेब माझ्या काही…”

यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या अमराठी लोकप्रतिनिधींची आकडेवारीच सादर केली. “मुंबईत भाजपाचे तीन खासदार आहेत. त्यात दोन अमराठी आहेत. १७ आमदार आहेत. त्यात ७ आमदार अमराठी आहेत. महापालिकेत भाजपाचे ८२ नगरसेवक आहेत. त्यात जवळपास ७० नगरसेवक अमराठी, परप्रांतीय आहेत”, असं त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

“एकनाथ शिंदेंचा आम्ही बऱ्याच वेळा चांगला अनुभव घेतला आहे. ते खरंच शब्द पाळणारे होते. २३६ वॉर्ड तुम्हीच केले होते. पण भाजपाच्या नादाला लागून ते २२७ करत आहेत. मग शब्द कोण फिरवतंय? तुम्ही आज फक्त म्हणायला शिवसैनिक आहात. शब्द फिरवणारे अशी तुमची प्रतिमा होतेय. ती फार घातक आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळीच लक्ष द्यावं”, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena kishori pednekar slams cm eknath shinde with bjp alliance pmw