“मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे वाहतूक कोंडीमुळे होत आहेत”, असं विधान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केल्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबईत बोलताना अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना हा दावा केला होता. त्यावर आता शिवसेनेकडून खोचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टोला लगावताना “अमृता ताईंचा त्रास फार वेगळा आहे”, असं म्हटलं आहे. एबीपीसोबत बोलताना त्यांनी भाजपाच्या इतर नेत्यांच्या विधानांवर देखील निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा…”

किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात बोलताना अमृता फडणीस यांनी फारच मोठा जावईशोध लावल्याचं म्हटलं आहे. “अमृता ताईंसारखी सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. कारण सामान्य स्त्रिया आपण येता-जाता रस्त्यावर बघत असतो. दरवेळी उठायचं आणि वेगवेगळं काहीतरी बोलायचं. आज तर त्यांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे की ३ टक्के घटस्फोट वाहतुकीच्या कोंडीमुळे होत आहेत. म्हणजे यांच्यावर आता हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे. करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा भाजपाच्या इतर सामान्य स्त्रियांपासून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अशा सगळ्यांच्या कमेंट आपण ऐकतोय. हे सगळे जावईशोध हेच लावत आहेत”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईला बदनाम करण्याचं काम?

दरम्यान, भाजपाकडून मुंबईला बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला. “मुंबईचे रस्ते १०० टक्के गुळगुळीत आहेत असा आम्ही कधीही दावा केला नाही. पण जिथे दिथे आम्हाला खड्डे दिसले, ते भरण्याचं आम्ही काम करत आहोत. अमृता ताईंसहित भाजपाच्या इतरांना जो काही त्रास होतोय, तो फार वेगळा आहे. त्यामुळे मुंबईला नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचं काम भाजपा करत आहे. मुंबईकर या करमणुकीच्या कार्यक्रमांनाही कंटाळला आहे”, असं महापौर म्हणाल्या.

“आत्तापर्यंतची त्यांची विधानं भयानकच, पण..”

“दरवेळी कुणीही उठतंय आणि काहीही बोलतंय. घरात वेळ द्यायला मिळत नाही हा त्रास तर आम्हा महिलांनाही होतो आहे. पण तो वाहतूक कोंडीमुळे नाही. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो आहोत. आमचा जास्त वेळ लोकांमध्ये, जनतेत जातो. तुमचा वेळ कुठे जातो हे आम्हाला माहिती नाही. पण वाहतूक कोंडीमुळे वेळ देऊ शकत नाही, हा त्यांचा जावईशोध भयानकच आहे. आत्तापर्यंत त्यांनी सगळी विधानं भयानकच केली आहेत, त्यातलं हे फारच भयानक विधान आहे”, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे.

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…”

“जे काही १०५ घरी बसले आहेत, त्याचा त्यांच्या घरातल्या सामान्य स्त्रीला त्रास होतोय. त्या त्रासापोटी ही विधानं होत आहेत. खूपच भ्रमिष्टासारखी विधानं केली जात आहेत. जो उठतोय तो राजकारणात उडी मारतोय आणि आघाडी सरकारवर बोलतोय. महाराष्ट्र आणि मुंबईविषयी बोलण्यापेक्षा केंद्रात बोला आणि राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं मिळवून द्या. तुम्ही इतक्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या, तर लवकर काहीतरी चांगलं महाराष्ट्राला मिळेल”, असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होतात; अमृता फडणवीसांचा दावा

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“मी एक सामन्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena kishory pednekar mocks amruta fadnavis statement on divorce due to traffic jam pmw
Show comments