मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी नद्या दुथडी भरून वाहत असून बहुतांशी ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला असून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारकडून पुरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
अशी एकंदरीत स्थिती असताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांना पुरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे-जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याची हीच ती वेळ आहे.”
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. पावसामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे आणि सरकार म्हणून असलेली दोन डोकी फक्त शाब्दिक आश्वासनांचीच पतंगबाजी करत आहेत, अशी उपरोधिक टीका ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली होती. मंत्रिमंडळ स्थापनेला होणारा उशीर, राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि मंत्रिमंडळ स्थापनेबाबत राज्यपालांची उदासीनता यांसारख्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षांवर सामनातून टीका केली होती.