भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत सध्या देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध विधानं केली जात आहेत. अलीकडेच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन, चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटा लावावा, अशी मागणी केली. यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी अशा नेत्यांचा फोटो चलनी नोटांवर असावा, अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली. या घटनाक्रमानंतर संबंधित राजकीय नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो एडिट करून, संबंधित नाणं फायनल करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. या प्रकारानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्याच्या घडीला नारायण राणे यांची किंमत चार आण्याची आहे” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा- “अध्यक्ष महोदय, हे फायनल करा” २५ पैशांच्या नाण्यावर लावला नारायण राणेंचा फोटो, तक्रार दाखल, पाहा फोटो

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचा फोटो २५ पैशांच्या नाण्यावर लावल्याबाबत विचारलं असता छगन भुजबळांनी उपरोधिक टोला लगावला आहे. “व्हायरल नाण्याबद्दल मला कल्पना नाही, पण नारायण राणे आमचे चांगले मित्र आहेत. भारतीय चलनावर त्यांचा फोटो आला असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे?” अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.