राज्यातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, आनंदाचा शिधा आणि अन्य विषयांवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीपूर्वी खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ४० आमदारांना गाडण्यासाठी महाराष्ट्रातील लोक वाट पाहत आहे. निवडणूक लागली की लोक त्यांना घरी बसवतील, असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.
अरविंद सावंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माहिती अधिकाराअंतर्गत ‘वेदान्त फॉक्सकॉन’ प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच राज्याबाहेर गेल्याच समोर आलं आहे. त्यावर अरविंद सावंत म्हणाले, “संतोष गावडे नावाच्या मुलाने ३१ ऑक्टोंबरला पत्र लिहलं आणि तेव्हाच त्याला उत्तरही आलं. एमआयडीसीकडे उत्तर तयार होतच, फक्त कोणाच्या तरी पत्राची वाट पाहत होते,” असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा : संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; म्हणाले, “मी भेटीला आलो कारण…”
“प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात गेला असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठका का घेतल्या. याप्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारची चिरफाड केली आहे. तसेच, समोरासमोर येऊन चर्चा करा, असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिलं आहे,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं.