रत्नागिरीमधील दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या मेळावा माजी मंत्री रामदास कदम यांनी घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वरुन ही सभा पाहून माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या, सोनिया गांधींच्या नादी लागून वाया गेला, म्हणत असतील असेही विधान रामदास कदम यांनी केलं होतं. आता रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यांचा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी समाचार घेतला आहे.
“रामदास कदम यांनी घेतलेली सभा राजकीय वैचारिकतेला छेद देणारी आहे. त्यांनी वापरलेली भाषा आजतागायद कोणीही वापरली नाही. रामदास कदमांचे भाषण महाराष्ट्रात पाहिल्यानंतर महिला त्यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे.
हेही वाचा – “…तर पेट्रोल २० ते २५ रुपयांनी स्वस्त होईल”; हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं गणित
“वैचारिक पातळी आहे की नाही”
भास्कर जाधव आणि त्यांची पत्नी माझ्या पाया पडले, असं रामदास कदम यांनी म्हटलं होते. त्यावरुन भास्कर जाधव यांनी रामदास कदमांची वैचारिक पातळी काढली आहे. “वडिलांचं निधन झाल्यानंतर रामदास कदम, सुनील तटकरे, अनंत गिते, हसन मुश्रीफ आले. समवयस्क मंडळी असलेल्या सर्वांच्या आम्ही सपत्नीक पाया पडलो. मात्र, रामदास कदम याचा अर्थ राजकारणाशी जोडत आहेत. रामदास कदमांना तातडीने वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे,” असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं.