शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरेंनी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, तेव्हाच बाळासाहेब हा विषय त्यांच्यासाठी संपला. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला त्याच शरद पवारांच्या मांडीवर उद्धव ठाकरे जाऊन बसले, अशी बोचरी टीका रामदास कदमांनी केली. यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. रामदास कदम यांच्यासारखा कृतघ्न माणूस मी कधीही बघितला नाही, अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे. ते गुहागर याठिकाणी ‘टीव्ही९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “…नाहीतर अजित पवारांनी शिवसेना खाऊन टाकली असती” रामदास कदमांचा जोरदार हल्लाबोल!
रामदास कदमांच्या विधानाबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले, “रामदास कदम कोण आहे? त्यांचा शिवसेना मेळाव्याशी काय संबंध आहे? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. रामदास कदम सध्या ज्यापद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, जे आरोप करत आहेत, जी भाषा वापरत आहेत, यावरून रामदास कदम इतके कृतघ्न असतील, असं मला वाटलं नव्हतं.”
हेही वाचा- “राज्यात जातीय दंगली घडवण्याचा…” भाजपाचा उल्लेख करत भास्कर जाधवांचं गंभीर विधान!
“जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा झाला होता, तेव्हा रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणून भाषण केलं होतं. तोच दसरा मेळावा आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होऊ नये, असं म्हणणं म्हणजे ते किती कृतघ्न आहेत. ते किती उलट्या काळजाचे आहेत, ते किती बेईमान आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.