शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केलीय. खैरेंनी सत्तारांना हिरवा साप म्हणत त्यांना एकदा माईकने मारणार होतो, असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं. तसेच अब्दुल सत्तार संभाजीनगर कधीच म्हणत नाही, नेहमी औरंगाबाद असंच म्हणतात, असाही आरोप केला. ते औरंगाबादमध्ये एका सभेत बोलत होते.
चंद्रकांत खैरे म्हणाले, “अब्दुल सत्तार म्हणाले की, खैरेंचं काय राहिलं, खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाका. सत्तारांना हे कळत नाही की गोमुत्र किती पवित्र असतं. आम्ही रोज घरात हिंदुत्वाप्रमाणे गोमुत्र शिंपडतो, आम्ही हिंदुत्व जाणतो. मात्र, हे वाटेल तसं बोलतात. सत्तार म्हणाले की, मी आता पालकमंत्री म्हणून किती चांगलं काम करत आहे. याआधी कोणीच काम केलं नाही. मात्र, सत्तारांनी काम करून दाखवावं. त्यांना या कामातलं काय समजतं. डीपीडीसीमध्ये काय चाललं आहे हे काही समजतं का? ते फक्त पैसे कसे मिळतील हे पाहतात.”
“शिंदेंच्या मागेपुढे फिरून कॅबिनेट मंत्रिपद घेतलं”
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांना काय नाही दिलं. असं असताना हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले, शिवसेना सोडून गेले. तिकडे एकनाथ शिंदेंच्या मागेपुढे फिरून कॅबिनेट मंत्रिपद घेतलं, मात्र इकडे कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही का? कशासाठी हे सर्व सुरू आहे? इथेही ते कॅबिनेट मंत्री होते,” असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलं.
“एकदा मी सत्तारांना माईकने मारणार होतो”
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, “अब्दुल सत्तारांनीही तेच केलं. मात्र, सत्तार नावाचा हा हिरवा साप संभाजीनगर कधीच म्हणत नाही, ते औरंगाबाद म्हणतात. एकदा डीपीडीसीमध्ये मी माईकने मारणार होतो. तेव्हा पतंगराव कदम माझ्या बाजूला होते. ते म्हणाले खैरे तुम्ही पालकमंत्री होता, असं मारामाऱ्या करू नका.”
हेही वाचा : फडणवीसांनी राज्यपालांची पाठराखण केल्यानंतर संजय राऊत आक्रमक; म्हणाले “म्हणजेच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज…”
“मी पतंगरावांना सांगितलं की, सत्तार संभाजी महाराजांचा अपमान करतात. त्यांना काय सोडायचं? यांनी अनेक जमिनी हडपल्या आणि हे यांचे मंत्री आहेत,” असं म्हणत खैरेंनी सत्तारांवर सडकून टीका केली.