शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. “याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार” या म्हणीचा उल्लेख करत हनुमान चालिसा म्हणण्यावरून अंधारे यांनी राणांवर टीकास्त्र डागलं आहे. “उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही” अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती. त्यावर पलटवार करताना अंधारे यांनी भाजपा सरकारवरही निशाणा साधला आहे. “१०५ आमदार, ४० बंडखोर, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोगासह तपास यंत्रणांना ज्यांनी तीन महिन्यांपासून कामाला लावले आहे, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत”, असे अंधारे म्हणाल्या आहेत.
“नवनीत नाम सुनके…” नवनीत राणांची डायलॉगबाजी, पती रवी राणांवरही कौतुकाचा वर्षाव
हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी करोना महामारीत लोकांचे जीव वाचवले. गुवाहाटी, हाटील…झाडी…करत फिरायला त्यांच्याकडे ‘टुरिंग टॉकिज’ नव्हतं, असा हल्लाबोलही अंधारे यांनी राणांवर केला आहे. दरम्यान, अंधारे यांनी नवनीत राणांच्या मराठी भाषेविषयीच्या आकलनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नवनीत राणांना मराठी भाषा कळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
“काय ते मंत्री..काय त्यांचे नाव..काय त्यांचा…”, अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट, तानाजी सावंतांना टोला!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. “उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते” अशी खोचक टीका राणांनी केली होती. उद्धव ठाकरे राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले आहेत, असेही राणा यांनी म्हटले होते.