शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्याने मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटातील नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम अद्यापही युवासेनेत कार्यरत आहेत. यावरून सवाल उपस्थित होत आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यापासून रामदास कदम हे सातत्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यात सिद्धेश कदम युवासेनेत कार्यरत असल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी वरुन सरदेसाई आणि सुरज चव्हाण यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावर आता माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर रामदास कदम यांनी मदत केली. त्यानंतरही उद्धव ठाकरे ठाकरेंनी कदम यांना सन्मानाने वागणूक दिली. मात्र, त्यांचे संस्कार ते दाखवत आहेत. मग मुलगा रामदास कदम यांना बोलण्यापासून रोखत नाही. तर, सुरज चव्हाण यांनी तात्काळ सिद्धेश कदम यांची हकालपट्टी करायला हवी होती,” असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.