मागील अनेक दिवसांपासून भाजपा नेते नारायण राणेंकडून दिशा सालियन प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं गेलं. मात्र, आता सीबीयच्या अहवालात दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचं म्हटलं. त्यामुळे दिशा सालियनची आत्महत्या, बलात्कार आणि खून असे आरोप खोटे ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेणाऱ्यांविरोधात मानहानी दावा दाखल करणार का? असा सवाल पत्रकारांनी शिवसेना नेते सचिन अहिर यांना विचारला. त्यावर त्यांनी आपलू भूमिका मांडली. ते बुधवारी (२३ नोव्हेंबर) मुंबईत बोलत होते.
सचिन अहिर म्हणाले, “निर्लज्जांना सीमा नसते. हे या प्रकरणातून पाहायला मिळते. भाजपाच्या काही लोकांनी आणि ट्रोलर्सने आदित्य ठाकरेंची व्यक्तिगत प्रतिमाहनन करण्याचं काम केलं. त्याचाच भाग म्हणून दिशा सालियन आणि रिया चक्रवर्तीचे फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. आज त्या भाजपाचे नेते कुठे आहेत?”
“आता थोडी लाज असेल तर माफी मागा”
“भाजपाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. आज सीबीआयने या नेत्यांच्या थोबाडात मारली आहे. त्यामुळे त्यांच्यात आता थोडी लाज असेल तर त्या सर्व प्रवक्त्यांनी किमान माफी आणि दिलगिरी व्यक्त केली पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे,” असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“बदनामी करणाऱ्यांना सीबीआय अहवालाची चपराक”
“राजकारणात आलेल्या युवा नेतृत्वाला बदनाम करणाऱ्यांना सीबीआय अहवालाने चपराक लगावली आहे,” असं म्हणत अहिर यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला.